” ही माझी शेवटची निवडणूक; संधी द्या, आशीर्वाद द्या “
माजी आमदार विजय भांबळे यांची भावनिक साद, आमदार रोहित पवार यांच्यासह हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल केला उमेदवारी अर्ज
ही लढाई सोपी नाही; बुथवर, गावात लक्ष ठेवा : आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जिंतूर/ परभणी : ” ही शेवटची निवडणूक म्हणून मी लढविणार आहे. अनेक लोकं पैशाचा महापूर आणतील. पण, माझ्याकडे द्यायला पैसा नाही. माझ्याकडे विकासाचे काम, प्रेम, निष्ठा आणि ईमानदारी आहे. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी मला एकवेळ संधी द्या. पदरात घ्या; आशीर्वाद द्या ” अशी भावनिक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांनी घातली आहे. मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार विजय भांबळे यांनी जोरदार रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने झालेल्या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी, नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार : आमदार रोहित पवार
जिंतूर मतदारसंघात पैशाचा महापूर येईल, दमदाटी, दडपशाही केली जाईल, अशा परिस्थितीत ही लढाई सोपी नाही. म्हणून विजय भांबळे यांना आमदार बनविण्यासाठी पंचेवीस दिवस जोश कायम ठेवा. बुथवर, गावात लक्ष ठेवा. भांबळे हे कमीतकमी ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी या वेळी उपस्थितांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. आमदार पवार म्हणाले, ” जिंतूर मतदारसंघातून विरोधकांचा भ्रष्टाचार आणि राज घालवून टाकायचे आहे. सर्वसामान्य जनतेचे राज्य आणायचे आहे. त्यामुळे स्वाभिमानी; सर्वांच्या संकटात आणि मदतीला धावून येणार्या भांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा” या वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, समर्थक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.