फटाके उडवतायेत…मग जरा जपूनच !

फटाके उडवतायेत…मग जरा जपूनच !

अशी घ्या काळजी : सुरक्षितता; कान-नाक-डोळ्यांची काळजी महत्त्वाची

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीला फटाके उडवण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मुले व युवा वर्ग फटाके उडवण्यात पुढे असतो. मात्र फटाके उडवताना सर्व प्रकारची काळजी व खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे; अन्यथा, गंभीर भाजण्याचे प्रकार व जखमा होऊ शकतात. कान, नाक, डोळ्यांचे कायमचे नुकसानही होऊ शकते, याकडे विविध तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

प्रौढांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी फटाके उडवणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो फटाके मैदानात किंवा निदान मोकळ्या जागेत उडवावेत, जेणेकरुन आवाजाचा त्रास आसपासच्या नागरिकांना होणार नाही. त्याचवेळी मोठे फटाके, बॉम्ब, रॉकेट, भुईनळे या प्रकाराचे फटाके लहान मुलांना उडवण्यासाठी देऊ नयेत. फटाके शरीरापासून सुरक्षित अंतरावर प्रज्ज्वलित करावेत आणि त्यासाठी लांब अगरबत्त्यांचा वापर करावा. फटाके हातामध्ये उडवण्याचा प्रयत्न करू नये आणि कपड्यांच्या खिशांमध्येही फटाके ठेऊ नयेत. फटाके उडवताना वाकू नये किंवा बसून फटाके उडवू नयेत. यामुळे ठिणगी डोळ्यात जाऊन अंधत्व येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे फटाके उडवताना पायात चपला किंवा बूट असणे आवश्यक आहे. ढगळ व नायलॉनचे कपडे घालून फटाके उडवू नयेत. न फुटलेले किंवा न वाजलेले फटाके पुन्हा उडवण्याचा प्रयत्न करू नका, यात फटाका फुटून अपघाताची भीती असते, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी घ्या काळजी
♦भाजलेल्या जखमेवर ताबडतोब थंड पाणी टाका, बर्फ वापरू नये. पाणी टाकल्याने त्वचेचे तापमान कमी होऊन जखमा खोलवर जात नाहीत.
♦जखमेवर स्वच्छ सुती कापड, बेडशीट टाका.
♦जखमेवर फोड आल्यास चांगले लक्षण समजावे. असे फोड स्वतः फोडू नयेत.
♦जखम स्वच्छ धुवुन तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.

तज्ज्ञ काय म्हणतात…

झाड या फटाक्याच्या प्रकारामुळे खूप जास्त अपघात होतात, हे लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी. कुठल्याही फटाक्यांमुळे भाजल्यास जखमेवर तत्काळ किमान २० मिनिटे पाणी टाकावे. त्यानंतर लवकरात लवकर तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा. – डॉ.रमाकांत बेंबडे, प्लास्टिक सर्जन

फटाक्यांच्या दारूमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते हे लक्षात घेऊन डोळ्यात फटाक्याची ठिणगी उडाली तर थंड पाण्याने डोळा हळूवार धुवावा. त्यानंतर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. – डॉ. राजीव मुंदडा, नेत्ररोगतज्ज्ञ

आवाजाचा फटाका कानाजवळ उडाला तर कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते; तसेच मोठ्या आवाजामुळे तात्पुरता किंवा कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. फटाक्यातील रसायनांमुळे अॅलर्जीचाही त्रास वाढतो. हे लक्षात घेऊन योग्य खबरदारी महत्त्वाची ठरते. – डॉ.रमेश रोहिवाल, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र कान-नाक-घसातज्ज्ञ संघटना


CR-Mata

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!