विधानसभा निवडणूक : निरीक्षकांनी घेतला निवडणूक विषयक बाबींचा आढावा
परभणी : निवडणूक निरीक्षक (सामान्य) के.हरिथा, संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी मंगळवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक बाबी व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने जिंतूर व परभणी विधानसभा मतदारसंघांकरीता श्रीमती के.हरीता, तर गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांकरीता संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर,अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते आदींसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत तसेच निवडणूक काळात बंदोबस्ताच्या नियोजनाविषयी माहिती दिली. श्री.विधाते यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक विषयनिहाय माहिती दिली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगितले.