विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये मतदार जनजागृती भर
गर्दीच्या ठिकाणी स्वीप पथकाने केली जनजागृती
जिंतूर : जिंतूर बसस्थानक परिसरात तसेच मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शिवाजी मगर , मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.
मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामध्ये स्वीप नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जनजागृती करण्यात आली. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा अशी भावना मनात ठेवून दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 ते संध्याकाळी 06 या वेळेत सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. असे आवाहन करण्यात आले. जिंतूर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षामधून मतदार जनजागृती करण्यात आली यासाठी केंद्रप्रमुख मारुती घुगे, दिनकर घुगे, प्रमोद दाभाडे, प्रभाकर नालंदे, नितीन पेठे यांनी मेहनत घेतली. स्वीप पथकातील सदस्य आणि साहित्यिक मयूर जोशी यांनी गीताच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. स्वीप पथकातील सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी मतदारांना मतदान करण्याबाबतची प्रतिज्ञा घेतली.