सेलूमध्ये रंगली ‘दिवाळी पहाट’

सेलूमध्ये रंगली ‘दिवाळी पहाट’

श्रुती संगीत विद्यालयाचा उपक्रम

सेलूमध्ये रंगली 'दिवाळी पहाट'

सेलूमध्ये रंगली 'दिवाळी पहाट'

सेलू : दिवाळीनिमित्त श्रुती संगीत विद्यालयाच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता. वरद विवेक दलाल यांचे शास्त्रीय गायन आणि रामदास कुलकर्णी यांच्या सोलो तबलावादनाने कार्यक्रम रंगला.
श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी सभापती अशोक काकडे, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव महेश खारकर, व्हिजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, यशवंत चारठाणकर, किशोरभाऊ जोशी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आरंभी अलका धर्माधिकारी यांनी भूपाळी, अभंग सादर केला. रामदास कुलकर्णी यांच्या सोलो तबलावादनाला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. वरद विवेक दलाल यांनी राग भैरव, तीन तालातील बंदिश, जय शंकरा गंगाधरा नाट्य गीत उत्कृष्टपणे सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. ‘आगा वैकुंठीचा राया, आगा विठ्ठल सकळा’ या भैरवीने सांगता झाली. साथसंगत सच्चिदानंद डाखोरे, रामदास कुलकर्णी, प्रद्युम्न  सावरगावकर यांनी केली. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तीन वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. रसिकांचा वाढता प्रतिसाद आहे, असे संयोजक गंगाधर कान्हेकर यांनी नमूद करून उपस्थितांचे आभार मानले. संयोजक गंगाधर कान्हेकर, रवि कुलकर्णी, रवी मुळावेकर यांच्यासह संयोजन समिती सदस्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!