स्वरांगण ‘दिवाळी पहाट’ ला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद
सेलूतील अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा सांस्कृतिक उपक्रम
सेलू/ परभणी : दीपावली पाडव्यानिमित्त सेलू शहरातील गायक कलावंतांनी स्वरांगण ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाद्वारे सादर केलेल्या भावभक्ती आणि चित्रपट गीतांना रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिप सभापती अशोक काकडे यांच्या वतीने श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभागृहात शनिवारी, दोन नोव्हेंबर रोजी सकाळी हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. प्रारंभी आरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक, उद्योजक रामप्रसाद घोडके, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आयोजक अशोक काकडे यांच्या हस्ते श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सच्चिदानंद डाखोरे व पूजा तोडकर यांनी गायलेल्या ‘घन:शाम सुंदरा’ या भूपाळीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सेलू येथील डाखोरे, तोडकर, मधुप्रिया कांबळे आणि लक्ष्मीकांत दिग्रसकर यांनी गायलेल्या एकाहून एक सरस भाव, भक्ती, चित्रपट गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. हम कथा सूनाते रामकी या गीताने सांगता झाली. गिरीश दीक्षित-ढोलक, नईम शेख-कीबोर्ड, प्रणव जोग-गिटार, कार्तिक हिंगणे- तबला, श्रीनिवास लंकावाड-बासरी, संदीप पुंडगे – ऑक्टोपॅड यांनी साथसंगत केली. महेश अचिंतलवार यांच्या बहारदार निवेदनाने मैफिलीत वैचारिक रंग भरले. प्रास्ताविक अशोक काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्रेक्षा भांबळे, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, पुरूषोत्तम पावडे, अशोक उफाडे, सर्जेराव लहाने, संतोष कुलकर्णी यांच्यासह पुरूष, महिला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.