परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात
जिंतूर (जि.परभणी) : येथील येलदरी रस्त्यावरील जागेच्या मालकीवरून रविवारी ( आठ मे) वाद निर्माण झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. जागेच्या मालकीची कागदपत्रे सय्यद मनखिद सय्यद हकीम यांच्या जवळ असून, त्यांनी नगर परिषदेकडून बांधकामाची रीतसर परवानगी घेतली बांधकाम सुरू केले होते. पण ही जागा आपल्या मालकीची आहे, हे बांधकाम रोखण्यात यावे, असा अर्ज माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी २१ मार्च २०२२ रोजी, याच जागेच्या मालकीच्या कागद पत्रासह नगर परिषदेकडे दाखल केला. त्यावर नगर परिषदेने मुखिद यांना नोटीस देऊन हे बांधकाम रोखले. त्यावेळी काही लोकांना या जागेवर पाठवून या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न बोर्डीकर यांनी केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यावेळी तात्पुरते हे प्रकरण मिटवले. या प्रकरणी कोक येथील रहिवासी बोर्डीकर समर्थक हमीदखान पठाण यांनी मध्यस्थी करून प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला, पण काहीही मार्ग निघाला नाही. रविवारी (आठ मे) सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान, याच जागेसमोर दगड भरलेले दोन टिप्पर बोर्डीकरांचे कार्यकर्ते कटारे यांनी आणून टाकले. या वरून पुन्हा वाद सुरू झाला. ही जागा सध्या मुखिद यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी दगड टाकण्यास विरोध केला. त्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपक शिंदे फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती आटोक्यात आणली. जागा आपल्याच मालकीची असून, या जागेच्या मालकीचे मुखिद यांच्याकडील कागदपत्रे बनावट आहे, असे बोर्डीकर यांचे म्हणणे आहे, तर जागेवर ताबा मिळवणारच असे बोर्डीकर सांगत आहेत. वादामुळे या जागेच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.