निवडणूक प्रक्रियेवर सूक्ष्म निरीक्षकांची असणार ‘नजर’
सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण उत्साहात
परभणी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षक हे भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे असून, या निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. निवडणुका नि:पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रकियेवर सूक्ष्म निरीक्षकांची बारिक ‘नजर’ असणार आहे.
परभणी जिल्ह्यातील निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण सोमवारी (११ नोव्हेंबर) रोजी उत्साहात पार पडले. निवडणूक निरीक्षक (सामान्य ) के.हरिथा, संचिता बिष्णोई, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी
प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. या वेळी नोडल अधिकारी सुनील हट्टकेर, सचिन कवठे यांची उपस्थिती होती. मतदान केंद्रावर सकाळी अभिरुप मतदान प्रक्रियेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणतीही कायदा मोडणारी बाब यावर कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोग हा सूक्ष्म निरीक्षकाकडून आलेल्या अहवालाची दखल घेतो, असे श्रीमती हरिथा व श्रीमती बिष्णोई यांनी सांगितले. मुख्य निवडणूक निरीक्षक हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने मतदान केंद्रावर नियुक्त सूक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, असे जिल्हाधिकारी श्री.गावडे म्हणाले.
मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणा तसेच सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका, कार्यपद्धती, जबाबदारी पारदर्शक आणि चांगल्यारितीने पार पाडता यावी, या विषयी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांसादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.
निवडणुकीसाठी १२० सूक्ष्म निरीक्षक
सुक्ष्म निरीक्षकाचे काम हे संवदेनशील असून, मतदान प्रक्रियेची संपूर्ण सविस्तर माहिती निरीक्षकास असणे आवश्यक आहे.
या विधानसभा निवडणुकीसाठी सहा संवेदनशील, तणावग्रस्त वातावरण आहे, त्या ठिकाणच्या तसेच एकाच परिसरात चार किंवा त्या पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी ४५, अशा एकूण १२० निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बॅंक, एलआयसी, केंद्रीय नवोदय शाळांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी या वेळी दिली.