साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त,
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वाशिम : शहरातील एका जबरी चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींविरुद्ध, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तीन मे रोजी चंद्रकांत शौकीराम जिवनानी ( रा.अल्लाडा प्लॉट वाशिम) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रकांत जिवनानी हे दुकानाच्या गल्ल्याील २ लाख रुपये व बिडी कलेक्शनचे १५ लाख असे एकूण १७ लाख रुपये दोन थैलीत घेउन स्कुटीवर घरी परतत असताना अनोळखी इसमानी गाडीला धक्का देऊन खाली पाडले. लाथाबुक्यांनी मारहाण करुन १७ लाख रुपये असलेली थैली घेऊन चोरटे पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेत असताना, आरोपी अनुपम मदन चिंचाबेकर ( वय २३, रा. एसएमसी मागे लाखाळा , वाशिम) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केली. त्याने तीन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून आरोपी बादशाह उर्फ अजय शिवराम राऊत (वय २१, रा. काकडदाती ता.जि.वाशिम), अरुण भारत खडसे (वय २३, रा.जांभरुण नावजी) आकाश आत्माराम चोपडे (वय २२, रा.येवता ता.रिसोड हल्ली मुक्काम काळे फाईल, वाशिम) यांना अटक करण्यात आली. आरोपीकडुन नगदी ६,५०,००० रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, असा एकूण ७,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चारही आरोपींना वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दानडे करीत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक भामरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, अतुल मोहनकर,पोहेकॉ सुनिल पवार, संतोष कंकाळ, राजेश राठोड, अमोल इंगोले, प्रशांत राजगुरु, राजेश गिरी, प्रविण राऊत, अश्विन जाधव, गजानन गोटे, नीलेश इंगळे, डिगांबर मोरे, अविनाश वाढे, शुभम चौधरी, सायबर सेलचे प्रशांत चौधरी, गोपाल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली (वार्ताहर : फुलचंद भगत, मंगरूळपीर/वाशिम)