
Authored by Babasaheb Helaskar
२३ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा
नाशिक : २३ व्या राष्ट्रीय मिनी व सबज्युनिअर टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने सहापैकी चार गटात, तर गुजरात संघाने दोन गटात विजेतेपद मिळवित, सुवर्णपदकांची कमाई केली.
नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सहा ते आठ मे या कालावधीत या स्पर्धा झाल्या. टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत मिनी गटात महाराष्ट्र संघाने अंतिम लढतीत गुजरात संघावर २-० असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले, तर सब ज्युनिअर गटातही अटीतटीच्या अंतिम लढतीत गुजरातचा २-१ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मिनी गटाच्या मिश्र दुहेरी प्रकारात महाराष्ट्राच्या जोडीने तेलंगणचा पराभव करून , तर सब ज्युनिअर मिश्र दुहेरी मध्येही महाराष्ट्राच्या जोडीने अंतिम लढतीत, आंध्रप्रदेशवर मात करून विजेतेपद मिळविले. गुजरात संघाने मिनी मुली आणि सब ज्युनियर मुली या दोन गटाचे विजेतेपद मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आमदार ॲड.राहुल ढिकले, क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, नगरसेवक रुची कुंभारकर, टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव दीपक पाटील, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, राज्य सचिव गणेश माळवे, फेडरेशनचे खजिनदार धर्मेंद्रसिंग जाडेजा, नर्सिम्मा, सहसचिव मुकेश बाथम, कर्नाटकचे सचिव नागेश्वरराव, डॉ.दिनेश शिगारम, रामेश्वर कोरडे , आशिष ओबेरॉय आणि सर्व राज्यांचे सचिव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले. स्पर्धेसाठी किरण घोलप, अक्षय गामणे, गणेश पाटील, एस. प्रसंगी, सिद्धांत लिपणे, राहुल पेटकर, उमेश सेनभक्त, नीलेश माळवे, गणेश कलंगुल, बंडू जमदडे, अभिषेक सोनवणे, तृषाली बरिया, नवाखाई पटेल, दीपक निकम, बाळासाहेब गुरव, प्राजंल उगले, सपना गरगटे, डिपंल सोनार, प्रवीण किंगरे, जयंत चिखले, साहील जोगदंड, पराग सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.