Cotton Market Selu : सेलू बाजार समितीच्या कापूस खरेदीला सुरूवात
क्टिंटलला ७ हजार ५२१ चा भाव
कापूस खरेदी हंगामाच्या निमित्ताने बाजार समितीतर्फे पाथरी रोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्यांची वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार ते बुधवार कापूस खरेदी लिलाव होणार आहे. आरटीजीएसव्दारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. इतर व्यापाऱ्यांना कापूस विक्री न करता केवळ सीसीआय व परवानाधारक जिनिंग व्यापाऱ्यांकडेच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करावा व होणारी फसवणूक टाळावी, तसेच स्वच्छ प्रतीचा आणि कचरा व आर्दता विरहित कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती चक्रधर पौळ व सचिव राजीव वाघ यांनी केले आहे.
सेलू/परभणी : जिल्ह्यात सर्वाधिक जिनिंग प्रेसिंग उद्योग असलेल्या सेलू् येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला लिलाव पद्धतीने बुधवारी, १३ नोव्हेंबररोजी सुरुवात झाली. भारतीय कापूस निगम(सीसीआय) आणि परवानाधारक खासगी जिनिंग व्यापाऱ्यांनी बोली लावून कापूस खरेदी केला. पहिल्याच दिवशी पाटोदा येथील शेतकरी अभिजीत अनिल बोराडे यांनी आणलेल्या कापूस सीसीआयने ७ हजार ५२१ रूपये दराने खरेदी केला आहे.
मुख्य कापूस यार्डात सीसीआय आणि खासगी जिनिंग व्यापाऱ्यांनी बोली लावून कापूस खरेदी केला. श्री.बोराडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सभापती चक्रधर पौळ, सचिव राजीव वाघ, संचालक रामेश्वर राठी, सुरेंद्र तोष्णीवाल, बाळू मंत्री, सीसीआयचे नितीन भरणे आदींंची प्रमुख उपस्थिती होती. लिलावामध्ये कापसाला क्विंटलला कमीत कमी ७ हजार १७५ रूपये, जास्तीत जास्त ७ हजार ५२१ रूपये, तर सर्वसाधारण ७ हजार २३५ रूपये दर मिळाला. या वेळी गोपाल काबरा, निर्मलभाई जैन, अविनाश बिहाणी, बिकीचेचीभाई, सोहनलाल, संतोष काष्टे आदी उपस्थिती होते.
कापूस खरेदी हंगामाच्या निमित्ताने बाजार समितीतर्फे पाथरी रोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्यांची वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार ते बुधवार कापूस खरेदी लिलाव होणार आहे. आरटीजीएसव्दारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. इतर व्यापाऱ्यांना कापूस विक्री न करता केवळ सीसीआय व परवानाधारक जिनिंग व्यापाऱ्यांकडेच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करावा व होणारी फसवणूक टाळावी, तसेच स्वच्छ प्रतीचा आणि कचरा व आर्दता विरहित कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती चक्रधर पौळ व सचिव राजीव वाघ यांनी केले आहे. कापूस खरेदी हंगामासाठी बाजार समितीचे दीपक शिंगणे, वशिष्ठ हिंगे, एकनाथ राऊत, सुरेश गायकवाड, अशोक वाटोडे, बालासाहेब गायकवाड आदींसह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, लांबलेला कापूस वायदे बाजार अखेर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून या वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.