निर्भीडपणे मतदान करून लोकशाही बळकट करा
डॉ.विलास मोरे यांचे आवाहन; देवगिरी प्रांतात मतदार जागृती अभियान
सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने विधानसभा निवडणूक २०२४ निमित्ताने देवगिरी प्रांतात मतदार जागृती अभियान सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे व आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून लोकशाही बळकट करावी तसेच भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क कायद्यान्वये अठरा वर्ष पूर्ण नागरिकाला दिलेला आहे. यामुळे सर्वांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही मजबूत करावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ विलास मोरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून विविध माध्यमांद्वारे देवगिरी प्रांतातील ८ जिल्हे व ७६ तालुक्यांमध्ये मतदान जागृती अभियान सुरू आहे. ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते जिल्हा तालुका व ग्राम ग्रामीण स्तरावर जाऊन मतदान प्रक्रिया समजावून सांगत आहेत. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासह महिला जागरण समितीच्या वतीने घरांसमोर दररोज सकाळी रांगोळ्या काढून मतदार जागृती करण्यात येत आहे. या अभियानात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय, प्रांतस्तरीय, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.