महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज
किरण चौधरी यांचे प्रतिपादन, विविध प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप
सेलू : कौशल्य विकासाचे महत्त्व पटल्याने महिला व मुलींच्या शिक्षणात वाढ होत आहे. परंतु, फक्त शालेय शिक्षण घेऊन उपयोग होत नाही. आपल्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी महिलांनी व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी केले. सेलू येथील शुभंकरोती फाउंडेशन, देसाई फाउंडेशन, स्कोर एसई इंडिया यांच्यामार्फत चालणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशस्तीपत्र वितरण सोहळा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शुभंकरोती फाउंडेशन, देसाई फाउंडेशन व स्कोर एसई इंडिया यांच्यामार्फत चालणाऱ्या शिलाई प्रशिक्षण, पार्लर प्रशिक्षण, कॉम्प्युटर प्रशिक्षण यामध्ये तीन महिन्याचा मोफत कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेला वाटचाल करत कुटूंबाला ही आर्थिक हातभार लावत असल्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन महिलांना गौरविण्यात आले.
महिलांनी व मुलींनी प्रशिक्षण शिबिराचा स्वत:च्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा, याबाबत माहिती दिली. शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी उपस्थित महिलांना सांगितले व संस्थेच्या विविध आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सेलू तालुक्यातील महिलांच्या उपस्थितीने भरगच्च भरलेले हे बाबासाहेब मंदिर सभागृह हे शुभंकरोती फाऊंडेशनच्या कार्याची पावती आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललिता गिल्डा, नयना बोर्डीकर, डॉ.रूपाली मालणी तसेच बाबासाहेब मंदिर येथील विश्वस्त श्री मनोज मंडलिक उपस्थित होते. शुभंकरोती फाउंडेशन सेलू तालुक्यात महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवते आणि त्या अनेक उपक्रमांची मी साक्षीदार आहे आहे अशी भावपुर्ण प्रतिक्रिया ललिता गिल्डा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. कोणताही गोष्ट सुरु करणे सोपे असते पण ती सातत्याने टिकविण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि हे सामाजिक कार्यातील सातत्य मी शुभंकरोती फाऊंडेशन च्या कार्यात पाहते असे मत डॉ. रुपाली मालिनी यांनी दिले. तर शिक्षण हे महिलांच्या जीवनाचा मूलभूत पाया आहे जो तिला सक्षम करून आर्थिक उन्नतीकडे घेऊन जातो अशी भावना नयना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या श्वेता गबाळे यांनी तर आभार निशिकांत पाटील यांनी केले.