विधानसभा निवडणूक २०२४ : मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणूक २०२४ : मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

परभणी जिल्ह्यातील चार विधानसभांसाठी ५८ उमेदवार रिंगणात, साडेपंधरा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी, २० नोव्हेंबररोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून एकूण १५ लाख ५४ हजार ५४७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिंतूर विधानसभा मतदार संघात १७, परभणी १५, गंगाखेड १२ आणि पाथरीत १४ असे एकूण ५८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रिया शांतते व सुरळित पार पडावी यासाठी विविध पथकांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी, १९ नोव्हेंबररोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांची उपस्थिती होती.

साडेपंधरा लाख मतदार

जिल्ह्यात एकूण १५ लाख ५४ हजार ५४७ इतके मतदार आहेत. यात जिंतूर मतदारसंघात एकूण ३ लाख ८८ हजार ३८८मतदारअसून त्यात २ लाख २६२ पुरूष व १ लाख ८८ हजार २२ महिला आहेत. परभणी मतदारसंघात एकूण ३ लाख ५० हजार ७२१ मतदार असून यात १ लाख ७८ हजार ८०८ पुरूष व १ लाख ७१ हजार ७४० महिलांचा समावेश आहे. गंगाखेडमध्ये ४ लाख २२ हजार ४६ मतदार असून यात २ लाख १८ हजार १२० पुरूष व २ लाख ३ हजार १४७ महिलांचा समावेश आहे. पाथरीत एकूण ३ लाख ९३ हजार ३९२ मतदार असून यात २ लाख ३ हजार ४५ पुरूष व १ लाख ९० हजार १९७ महिलांचा समावेश आहे. याशिवाय २८ तृतीयपंथी व सैन्य दलातील १ हजार १७८ मतदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६७.७३ टक्के मतदान झाले होते. या वर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

९३१ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग 

जिल्ह्यात एकूण १ हजार ६२३ मतदान केंद्र स्थापन करण्यात आहेत. त्यातील एकूण ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जिंतूर मतदारसंघात शहरी व ग्रामीण मिळून ४३८ केंद्र असून यातील २ संवेदनशील आहेत. परभणी मतदारसंघात एकूण ३३८ मतदान केंद्र असून यातील २ संवेदनशील आहेत. गंगाखेडमध्ये ४१५ मतदानकेंद्रांपैकी १, पाथरीत ४१५ पैकी १ मतदान केंद्र संवेदनशील आहे. चारही मतदारसंघात एकूण १ हजार ६२३ केंद्रांवर. १ हजार ७८७ केंद्राध्यक्षासह, मतदान केंद्र अधिकारी  व राखीव अधिकाऱ्यांसह एकूण ७ हजार १४८ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. १७१ क्षेत्रीय अधिकारी, विविध पथकात ५५० अधिकारी व कर्मचारी असे एकूण १२ हजार ५६८ मनुष्यबळ उपलब्ध  आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार महापालिका क्षेत्रातील शंभर टक्के, तर ग्रामीण भागातील ५० टक्के अशा एकूण ९३१ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे.

७२६२ जणांचे पोस्टल मतदान

जिल्ह्यात ८५ वर्षावरील वयोवृद्ध, दिव्यांग, सर्विस् वोटर तसेच पोलिस व निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. १७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ७ हजार २६२ इतके मतदान झाले असून, परभणी मतदारसंघात सर्वाधिक २ हजार ६५४ मतदान झाले आहे. जिंतूरमध्ये  १ हजार २७६,  गंगाखेड २ हजार ६७, तर पाथरीत १ हजार २६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

विविध पथकांसह मोठा पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यात एकूण २ हजार ३८४ बॅलेट युनिट, १ हजार ९४६ कंट्रोल युनिट आणि २ हजार १०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आले आहेत. सीव्हीजील अ‍ॅपद्वारे एकूण २८ तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. त्यापैकी केवळ ९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ५ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ लेखा पथक, १४ फिरते पथक, २० स्थिर सर्वेक्षण पथक, १६ व्हिडिओ चित्रीकरण पथक, ६  व्हिडिओ पाहणी पथक स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात निवडणुकीसाठी सीएपीएफच्या ३ कंपन्या व १ प्लाटून, एसएपीएफची १ कंपनी व २ प्लाटूनसह जिल्ह्यात १ हजार ७३८ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि १ हजार ४१७ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!