विधानसभा निवडणूक : परभणी जिल्ह्यात ७१.४५ टक्के मतदान
जिंतूर-सेलूमध्ये सर्वाधिक ७५.३६ टक्के, निकालाकडे लक्ष
परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात बुधवारी (२० नोव्हेंबर) सरासरी ७१.४५ टक्के मतदान झाले आहे. एकूण १५ लाख ५३ हजार ३६९ मतदारांपैकी ५ लाख ८३ हजार ८२४ पुरूष (७२.९६ टक्के), ५ लाख २६ हजार ७ महिला (६९.८५ टक्के), इतर २४ अशा एकूण ११ लाख ९ हजार ८४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.३६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल गंगाखेड मतदारसंघात ७३.०४ टक्के, पाथरीत ७०.९७ टक्के, तर सर्वात कमी ६५.७३ टक्के मतदान परभणी विधानसभा मतदारसंघात झाले आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत चारही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६३.०८ टक्के मतदान झाले होते. या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का सरासरी ८.३७ टक्क्यांनी वाढला आहे.
बुधवारी सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासात केवळ ६.५९ टक्के, सात ते अकरा वाजेपर्यंत १८.४९ टक्के, तर दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाले होते. तीन वाजता मतदानाचा टक्का ४८.८४ टक्क्यापर्यंत गेला. तर पाच वाजेपर्यंत ६२.७३ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच नंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या. काही ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. मतदानाची अंतिम टक्केवारी गुरूवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजता निवडणूक विभागाकडून कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात सरासरी ७१.४५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये ९५ जिंतूर विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ८८ हजार २९४ मतदारांपैकी १ लाख ५४ हजार ४१८ पुरूष (७७.११ टक्के), १ लाख ३८ हजार २०९ महिला (७३.५१ टक्के), इतर ७ अशा एकूण २ लाख ९२ हजार ६३४ मतदारांनी ( ७५.७६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. ९६ परभणी विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ५० हजार ५५९ मतदारांपैकी १ लाख २० हजार १७४ पुरूष (६७.२१ टक्के), १ लाख १० हजार २४३ महिला (६४.१९ टक्के), इतर ७ अशा एकूण २ लाख ३० हजार ४२४ मतदारांनी ( ६५.७३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. ९७ गंगाखेड विधानसभा मतदार संघात एकूण ४ लाख २१ हजार २७२ मतदारांपैकी १ लाख ६२ हजार ८६ पुरूष (७४.३१ टक्के), १ लाख ४५ हजार ५९७ महिला (७१.६७) अशा एकूण ३ लाख ७ हजार ६८३ मतदारांनी ( ७३.०४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. तर ९८ पाथरी विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ९३ हजार २४४ मतदारांपैकी १ लाख ४७ हजार १४६ पुरूष (७२.४७ टक्के), १ लाख ३१ हजार ९५८ महिला (६९.३८ टक्के) अशा एकूण २ लाख ७९ हजार १०४ मतदारांनी ( ७०.९७ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रिया शांततेत, निकालाकडे लक्ष
काही किरकोळ प्रकार वगळता, परभणी जिल्ह्यातील एकूण १६२३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. निवडणूक निरीक्षक के.हरिता, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, निरीक्षक संचिता बिष्णोई, राजेश दुग्गल, राहुल मिश्रा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जनार्दन विधाते, निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, प्रवीण फुलारी, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध केंद्राना भेटी दिल्या. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता. दरम्यान, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकूण ५८ उमेदवारांचे भवितव्य यंत्र बंद झाले आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.