विधानसभा निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण
जिंतूरमध्ये ३२, परभणी २५, गंगाखेड ३१, तर पाथरीत ३० फेऱ्या
परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बुधवारी (२० नोव्हेंबर) सरासरी ७१.४५ टक्के मतदान झाले आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीस्थळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिंतूरमध्ये मतमोजणीच्या एकूण ३२, परभणीत २५, गंगाखेडमध्ये ३१, तर पाथरीत ३० फेऱ्या होणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरूवारी (२१ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, महेश कुलकर्णी, सतीश रेड्डी, दत्तराव गिणगिणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाकडून मतमोजणी निरीक्षक म्हणून जिंतूरसाठी संजय कुमार मिश्रा, परभणी-के.हरिता, गंगाखेड-संचिता बिष्णोई, तर पाथरीसाठी ज्योती राय यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १६२३ मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी एकूण ८९ टेबल असणार आहे. यामध्ये ५६ टेबलवर ईव्हीएम मतमोजणी, २८ टेबलवर पोस्टल, तर पाच टेबलवर ईटीपीबीएस मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ११८ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. ईव्हीएम मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिपची मोजणी एका टेबलवर क्रमाने होईल.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जिंतूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, गंगाखेडमध्ये संत जनाबाई महाविद्यालय, तर पाथरी मतदारसंघातील मतमोजणी पाथरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी (जिंतूर), दत्तू शेवाळे (परभणी), जिवराज डापकर (गंगाखेड), शैलेश लाहोटी (पाथरी) हे आहेत. मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूला परवानगी नाही. तसेच पासेस शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी परिसरात २३ नोव्हेंबर रोजी १६३ कलम लागू करण्यात आले आहे