विधानसभा निवडणूक : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
परभणी जिल्ह्यात एकूण ११८ फेऱ्या, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित
परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीस्थळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १६२३ मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी एकूण ८९ टेबल असणार आहे. विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ अशा एकूण ५६ टेबलवर ईव्हीएम मतमोजणी, २८ टेबलवर पोस्टल, तर पाच टेबलवर ईटीपीबीएस मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ११८ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
जिंतूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, गंगाखेडमध्ये संत जनाबाई महाविद्यालय, तर पाथरी मतदारसंघातील मतमोजणी पाथरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. जिंतूरमध्ये मतमोजणीच्या एकूण ३२, परभणीत २५, गंगाखेडमध्ये ३१, तर पाथरीत ३० फेऱ्या होणार आहेत.
सर्व मतमोजणी प्रतिनिधी व उमेदवार यांना सकाळी सात वाजता हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. अंदाजे सकाळी ७.४५ वाजता स्ट्रॉगरूम उघडण्यात येणार आहे. यानंतर सकाळी आठ वाजता मतमोजणीबाबत मतदानाच्या गोपनीयतेची शपथ निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उपस्थितांना देणार आहेत. सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होणार आहे. साधारणतः अर्ध्या तासाने ईव्हीएम मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक फेरीअंती निकाल निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करून जाहीर करणार आहेत. मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वैधरित्या विजयी उमेदवार घोषित करणार आहेत.