महायुतीचा डंका : आमदार बोर्डीकर यांच्या विजयाचा जिंतूर, सेलूमध्ये जल्लोष
समर्थकांची आतषबाजी, आमदार बोर्डीकर यांची विजयी मिरवणूक
असत्यावर सत्याचा विजय : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघांतील जनतेने विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना मतदानरूपी भरघोस आशीर्वादाने सडेतोड उत्तर देत विकासकामांना प्राधान्य दिले आहे. हा असत्यावर सत्याचा विजय आहे, असे मी मानते. सर्व शक्तीमान जनतेलाच हा विजय समर्पित करते. – आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पक्ष), जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघ
सेलू/परभणी : परभणी जिल्ह्यातील चार पैकी जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या दणदणीत विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू झाला आहे. जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, तर गंगाखेडमध्ये महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय खेचून आणला आहे, तर पाथरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही दणदणीत विजय साकारला आहे. दरम्यान, महायुतीने मिळविलेल्या विजयाचा जिल्ह्यात सर्वत्र मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जिंतूर, सेलू शहरात आमदार बोर्डीकरांच्या विजयाचा मोठा जल्लोष साजरा होत आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संबंधित मतदारसंघातील मतमोजणीस्थळी मतमोजणी शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता सुरू झाली. जिंतूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, गंगाखेडमध्ये संत जनाबाई महाविद्यालय, तर पाथरीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मतमोजणी सुरू झाल्यापासून मतमोजणीस्थळाबाहेर महाविकास आघाडी व महायुतीच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी केंद्रांतून, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट तसेच सोशल मीडियासह विविध व्हाटस् ग्रुपमधून अपडेटस घेण्यासाठी नागरिकांसह कार्यकर्त्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढतांना दिसत होती. जिल्ह्यात विविध पक्ष, अपक्षांसह जिंतूर १७, परभणी १२, गंगाखेड १५, तर पाथरीत १४, असे एकूण ५८ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी अशा १२ तुल्यबळ उमेदवारात अतितटीचा सामना होताना दिसून आला. पहिल्या फेरीपासून समर्थकांनी आपापल्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांच्या आघाडीवरून विजयाचे आडाखे बांधायला सुरूवात केली.
जिंतूरमध्ये आमदार बोर्डीकर यांची विजयी मिरवणूक
जिंतूरमध्ये महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार विजय भांबळे यांच्यामध्ये सामना रंगला होता. पहिल्या फेरीपासून ते २२ व्या फेरीअखेर भांबळे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, २३ व्या फेरीपासून ३२ व्या फेरीअखेर बोर्डीकर यांनी घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत वाढत राहिले. बोर्डीकर यांनी निर्णायक विजयी आघाडी घेतल्यानंतर जिंतूर आणि सेलू शहरातील भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला. सेलू शहर भाजप कार्यालयासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिंतूर येथील बोर्डीकर यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जल्लोष सुरू झाला. या वेळी बोर्डीकर कुटुंबियांनी हात उंचावून सर्व चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारले. जिंतूर शहरातून मोठ्या जल्लोषात विजयी मिरणूक काढण्यात आली.
गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठमध्ये जल्लोष
गंगाखेड मतदारसंघात सुरूवातीला शिवसेना (उबाठा) उमेदवार विशाल कदम यांनी आघाडी घेतली मात्र, २१ व्याफेरीअखेर रासपचे आमदार डॉ..रत्नाकर गुट्टे यांनी आघाडी घेतली. गुट्टे यांचे मताधिक्य फेरीगणिक वाढत गेल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषाला सुरूवात केली. पाथरी विधानसभा मतदार संघातही २१ व्या फेरीअखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. याचा जल्लोष सोनपेठ, मानवत, पाथरी शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी साजरा केला.