परभणी जिल्ह्यात महायुतीचाच झेंडा
विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर, गंगाखेडात डॉ.गुट्टे, तर पाथरीत राजेश विटेकर विजयी; ठाकरे शिवसेनेचे डॉ.पाटील यांनी राखला परभणीचा गड
वडिलांच्या विजयाची लेकीने राखली परंपरा – जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांनी, वडिल माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सलग दुसऱ्यांदा विजयाची परंपरा राखत संस्मरणीय विजय मिळविला आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी १९९० व १९९५ च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून, तर २००४ मध्ये अपक्ष आणि २००९ मध्ये कॉंग्रेसकडून जिंतूर मतदारसंघातून विजय नोंदविलेला आहे. याची पुनर्रावृती २०१९ च्या विजयानंतर २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवून आमदार मेघना बोर्डीकर यांनी घडवून आणली आहे.
बाबासाहेब हेलसकर
परभणी : परभणी जिल्ह्यातील चार पैकी जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी या तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर, गंगाखेडमध्ये महायुती पुरूस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली आहे, तर पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर यांनी दणदणीत विजय साकारला आहे.
जिंतूर-सेलू मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा माजी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार विजय भांबळे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. पहिल्या फेरीपासून ते २२ व्या फेरीअखेर भांबळे यांनी आघाडी घेतली होती. परंतु २३ व्या फेरीपासून बोर्डीकर यांनी घेतलेले मताधिक्य फेरीगणिक वाढत राहिले. बोर्डीकर यांना १ लाख १३ हजार ४३२ मते मिळाली. ४५१६ मताधिक्याने त्यांनी विजय साकारला, तर प्रतिस्पर्धी भांबळे यांना १ लाख ८ हजार ९१६ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेसचे बंडखोर तथा वंचित बहुजन आघाडी उमेदवार सुरेश नागरे ५६ हजार ४७४ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
गंगाखेड मतदारसंघातही सुरूवातीच्या फेऱ्यात शिवसेना (उबाठा) उमेदवार विशाल कदम आघाडीवर होते. मात्र २१ व्या फेरीनंतर महायुती पुरूस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे मताधिक्य वाढत गेले. प्रतिस्पर्धी विशाल कदम यांचा २६२९२ मताधिक्याने पराभव करीत आमदार डॉ.गुट्टे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. डॉ.गुट्टे यांना १ लाख ४१ हजार ५४४ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी कदम यांना १ लाख १५ हजार २५२ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर तथा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट ४३ हजार २६ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रस (अजित पवार ) पक्षाचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर यांनी १३ हजार २४४ मताधिक्याने कॉंग्रेसचे उमेदवार तथा आमदार सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला. विटेकर यांना ८३ हजार ७६७ मते मिळाली. प्रतिस्पर्धी वरपुडकर यांना ७० हजार ५२३ मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान (गब्बर) हे ५४ हजार ६४७ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार अब्दुल्ला खान उर्फ बाबाजानी दुर्राणी हे ४८ हजार २५७ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.
ठाकरे गटाचे डॉ.पाटील यांनी राखला परभणीचा गड
परभणी विधानसभा मतदारसंघात दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. यामध्ये महाविकासआघाडीचे शिवसेना (उबाठा) उमेदवार तथा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक करीत परभणीचा गड राखला आहे. पाटील यांनी ३४२१६ मताधिक्य घेत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंद भरोसे यांचा पराभव केला. पाटील यांना १ लाख २६ हजार ८०३ मते मिळाली, तर भरोसे यांनी ९२ हजार ५८७ मतांपर्यंत मजल मारता आली.