डॉ.संजय रोडगे यांची शिक्षणक्षेत्रातील धडपड अतुलनीय
डॉ.ऋतुराज साडेगावकर यांचे प्रतिपादन, सेलू डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉ.रोडगे यांचा सत्कार
सेलू : ईएसएफईकडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड मिळाल्याबद्दल सेलू डॉक्टर्स असोसिएशन तर्फे श्रीराम प्रतिष्ठनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना सेलू डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगावकर म्हणाले की, डॉ.रोडगे यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तेथे उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. जगामध्ये शिक्षण क्षेत्रात नवनवीन संशोधनात्मक काय चालले आहे. त्याचा शोध घेऊन आपल्या शाळेमध्येही त्यापेक्षाही चांगल्या प्रकारे नवीन वैज्ञानिक संकल्पना राबवण्याचे कार्य डॉ.रोडगे यांच्या हातून होत आहे. त्यांची शिक्षणक्षेत्रातील सततची धडपड अतुलनीय आहे. मुंबईमध्ये ईएसएफईकडून स्टार एज्युकेशन पुरस्काराने डॉ.रोडगे यांना सन्मानित करण्यात आले. याचा सर्वांना अभिमान आहे.
या वेळी डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.राजेंद्र गात, डॉ.नंदकुमार कुंदनानी , डॉ.अरविंद बोराडे, डॉ.अशोक नाईकनवरे , डॉ.राजेंद्र केवारे, डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.उमेश गायकवाड , डॉ.राजेंद्र मुळावेकर , डॉ.आलेश बुरेवार , डॉ.राजेंद्र कारके, डॉ.सोमेश्वर गजमल, डॉ.कुंदन राऊत, डॉ.सचिन काळे डॉ.योगेश बोराडे, डॉ.वसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
मी ध्येयवेडा; नाविन्यपूर्ण प्रयोग करतच राहणार : डॉ.संजय रोडगे
सत्काराला उत्तर देताना डॉ.संजय रोडगे म्हणाले की, येत्या २६ डिसेंबरला मला सेलूमध्ये येऊन तीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले. चांगले वाईट अनुभव घेतले. परंतु मागील काही दिवसापासून ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अनेकदा बाहेरही याबाबत कौतुक झाले आहे. छोट्या शहरांमध्ये राहून अशा प्रकारची विविधतेने नटलेली शाळा निर्माण करणे हे खरे तर खूप अवघड बाब आहे. तरीही लोक आम्हाला वेडे म्हणतात त्याचप्रमाणे मी ध्येयवेडा आहे, असे मी समजतो.
डॉ.रोडगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबवणे. त्यासाठी पैसा किती लागतो, याकडे मी कधीच लक्ष दिलेले नाही. माझ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मी जगातील शिक्षण पद्धती किंवा नवनवीन संकल्पना काय आहेत. त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना व्हावा, यामागे हाच माझा हेतू असतो. हे सर्व करत असताना नाविन्यपूर्ण कल्पना राबवणारी शाळा म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. एका छोट्याशा गावामध्ये आमच्याकडे रोबोटिक लॅब, व्हीआर लॅब, एआय वर आधारित पुस्तके आहेत. यापुढेही नाविन्यपूर्ण प्रयोग करत राहणार आहोत. या सर्व प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच शुभेच्छांनी मला प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगितले. या प्रसंगी डॉ.राजेंद्र मुळावरेकर यांनी ‘मांगी थी एक दुवा, जो कबूल हो गई’ या गीताचे सुंदर असे सादरीकरण केले. या गीतामधून त्यांनी डॉ.रोडगे यांच्यामध्ये एकप्रकारे ऊर्जात्मक नवचैतन्य यावे आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.