शेतकर्यांना कापसाचे संपूर्ण पैसे बँकेतून द्यावेत
सेलू तालुका दबाव गटाची मागणी, सहाय्यक निबंधकांना निवेदन
सेलू : शेतकऱ्यांना कापूस खरेदीची सर्व रक्कम देण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाधिकार्यांना आदेश करावा, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक (सहकार) सेलू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेलूत सध्या सी. सी. आय.तर्फे कापूस खरेदी चालू आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे आधीच शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परत महागडी बियाणे, खते व औषधी शेतीसाठी वापरावी लागली. कापूस वेचणीलाही मोठ्या प्रमाणात मजूरी लागत आहे. तसेच अतिवृष्टीने कापूस उत्पादनात दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
शेती व्यवसायात यावर्षी सोयाबीन, कापूस इत्यादी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामध्ये सी सी.आय. तर्फे कापूस खरेदी सुरु आहे. मात्र कापसाचे पैसे देताना या संस्थेकडून शेतकर्यांची अडवणूक होत आहे. कापूस खरेदीनंतर संबंधित शेतकर्यांना संपूर्ण रक्कम मिळणे आवश्यक आहे. परंतू जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सेलूमध्ये जमा झालेली रक्कम बँक शेतकर्यांना पुर्ण न देता मनमानी पध्दतीने देत आहे. ही बाव शेतकर्यांवर अन्याय करणारी आहे. आधीच शेेती नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आहे. परत जि.म.स.बँक शाखा सेलूच्या या कारभाराने शेतकरी अडचणीत येत आहेत.
सहकार विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू शाखेत कापसाची जमा झालेली रक्कम शेतकर्यांंच्या मागणीप्रमाणे देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. निवेदनावर सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अॅड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पोळ, सतिश काकडे, आबासाहेब भुजबळ, दिलीप मगर, मुकुंद टेकाळे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र आघाव, भारत रवंदळे, दत्तराव कांंगणे, इसाक पटेल, राजेंद्र केवारे, उध्दव सोळके, दत्तात्रय पौळ, अॅड.टी. ए. चव्हाण, अॅड. योगेश सुर्यवंशी, उमेश काष्टे, नारायण पवार, रामचंद्र कांबळे, जलाल, रौफ, अजित मंंडलिक आदींच्या सह्या आहेत.