‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद
सेलूतील साईराज बोराडे मित्रमंडळातर्फे विनामूल्य आयोजन
सेलू/परभणी : आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग -एक हा चित्रपट सेलू येथील मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि साईराज बोराडे मित्रपरिवारातर्फे रविवारी, १ डिसेंबर रोजी विनामूल्य दाखविण्यात आला. या उपक्रमाला सेलू शहर व परिसरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी साडे अकरा वाजता मीनाक्षी चित्रपटगृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
चित्रपट पाहाण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि तुषार शेलार दिग्दर्शित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व नागरिकांसाठी विनामूल्य चित्रपट दाखवण्यात आला. महिला, मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती, असे आयोजक साईराज बोराडे यांनी सांगितले. या वेळी राहुल राजूरकर, राजेंद्र झोडगावकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. आयोजनासाठी साईराज बोराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.