श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव रविवारपासून
सेलूमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलूचे शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव येत्या रविवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या यात्रा महोत्सवात दररोज श्रीच्या मूर्तीस लघुरुद्र व पवमान अभिषेक, अखंड हरिनाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, महिला मंडळाचे भजन तसेच कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नादविहार संगीत परिवार, सेलू यांच्या वतीने अखंड विष्णुसहस्रनाम सप्ताह तसेच विवेक वसंत मंडलिक व गोविंद वसंत मंडलिक यांचे शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण तर सारंग रामचंद्र सराफ वओंकार नर्सीकर यांचे ऋग्वेद शाकल संहिता पारायण होणार आहेत. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून “श्रीमद भागवत कथेचे ” निरूपण सकाळी ११ ते ४ या वेळेत होणार आहे. ८ ते १० डिसेंबर या कालावधीत दररोज रात्री ९ वाजता बालासाहेब महाराज नेब (समर्थ जांब) यांचे सुश्राव्य कीर्तन आहे.
११ डिसेंबर रोजी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांची पुण्यतिथी आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे सामूहिक ३ पाठ होणार आहेत. ९ वाजता श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय पठन व सायंकाळी ” श्रीं ” ची आराधना, अभिषेक व महापूजा होणार आहे. रात्रौ ९ वाजता श्री केशवराज बाबासाहेबांच्या चरित्रावर वसंतबुवा मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे .
१२ व १३ डिसेंबर राजी रात्री ९ वाजता परभणी येथील शंकर महाराज आजेगावकर यांचे कीर्तन होणार आहे. १४ डिसेंबर रोजी श्रीमद भागवत कथेची समाप्ती होणार असून दुपारी माजी जिल्हा परिषद सभापती अशोकराव काकडे यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ ९ वाजता माऊलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांचे श्री हरी कीर्तन होणार आहे .
१५ डिसेंबर हा या यात्रा महोत्सवाचा मुख्य दिवस असून दुपारी १२ वाजता “श्री ” ची महाआरती, तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी ३ वाजता “श्री ” ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भागवतकार सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .
या यात्रामहोत्सवात सेलूतील महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच मृदंगाचार्य विठ्ठल काळे, सदाशिव समेळ, बाबासाहेब खुपसेकर, भास्कर डासाळकर, सुधाकर शिंदे, तबला वादक केदार तांबट हे उपस्थित राहणार आहेत. तर संवादिनी साथसंगत नागनाथराव विडोळीकर, वसंतबुवा मंडलिक, गंगाधर कान्हेकर करणार आहेत. या महोत्सवात लघरुद्र अभिषेक करू इच्छिणार्यांनी वामन नारायणराव मंडलिक यांचेशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. यात्रा महोत्सवात शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा, श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केशव, वामन व पुरुषोत्तम नारायणराव मंडलिक यांनी तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.