प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचeलित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे विज्ञान शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळेचे उद्घाटन शनिवारी,३० नोव्हेंबररोजी झाले. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.संजय रोडगे होते. सचिव डॉ.सविता रोडगे, प्रमुख पाहुणे डॉ. ऋतुराज साडेगावकर, डॉ.अंजली हडसनकर, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
अध्यक्ष डॉ.संजय रोडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थी सर्वांगिण विकासामध्ये जिज्ञासा व कुतुहल जागृत करुन शिकविल्यास ते अधिक प्रभावी ठरते. विज्ञान विषय शिकवितांना विद्यार्थ्यांचे कुतुहल जागे करुन त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी दिली पाहिजे. ही संधी देण्यासाठी शाळेमध्ये प्रयोगशाळा असणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान म्हणजेच प्रयोग व प्रात्यक्षिके. विज्ञान व प्रयोगशाळा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज जगाच्या संपूर्ण प्रगतीची गुरुकिल्ली म्हणून विज्ञान व वैज्ञानिक शोध यांचेकडे पाहिले जात आहे.
वर्गखोलीमध्ये केवळ खडू व फळा यांच्या साह्याने विज्ञान शिक्षण परिणामकारक होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकासह शैक्षणिक अनुभव देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: प्रयोग करावेत, उपकरणे हाताळावी, त्यांची योग्य ती निगा राखावी यासाठी प्रयोगशाळा अत्यंत आवश्यक व महत्वाची ठरते. असे बोलून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा स्तोत्र जागृत केले. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे, अशी आशा व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे डॉ.ऋतुराज साडेगावकर, डॉ.अंजली हडसनकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहन केले.
सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले. आभार अश्विनी हिबारे यांनी मानले.