श्री जिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जवळा येथे यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
सेलू/परभणी : श्री खंडोबाचा अवतार म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जवळा (ता. सेलू) येथील जिवाजी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला शुक्रवारी सुरूवात झाली. शनिवारी, ७ डिसेंबररोजी चंपाषष्ठी निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “यळकोट यळकोट… जय मल्हार”चा गजराने दुमदुमून गेला. यात्रा उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारी चार वाजता बाणदार खेळणे हा पारंपरिक कार्यक्रम झाला. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. भक्तांना दर्शन सुरळित घेता यावे, याकरिता स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. आरोग्य सेवा, बस, अग्निशामक विभागाचीही मदत यात्रा स्थळी होती. वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीच्या प्रसादाचा भावीकांनी लाभ घेतला. वाहतूक व दर्शन व्यवस्थेसाठी सेलू पोलिस ठाणे व गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ यात्रा उत्सवासाठी पुढाकार घेत आहेत.