संविधान प्रतिमा अवमान घटनेचा सेलूत तीव्र निषेध; कडकडीत बंद
प्रशासनाला निवेदन, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी
सेलू/परभणी : १० डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिमेचा अवमान घटनेचा सेलूतील आंबेडकर प्रेमी नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवित बुधवारी सेलू शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदला व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.
आंबेडकर प्रेमी नागरिकांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिमा सोपान दत्तराव पवार रा.मिर्झापूर ता.जि.परभणी या व्यक्तीने उचलून रोडवर फेकून दिली आहे. या व्यक्तीवर देशद्रोहीचे गुन्हे दाखल करून त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच या देशद्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे याची चौकशी करुन त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ॲड.पौर्णिमा जोहीरे, कमल लोखंडे, पाईकराव, सरोदे आदींनी प्रशासनाला निवेदन दिले. नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. तलाठी मुकुंद आष्टीकर उपस्थितीत होते. निवेदनावर मिलिंद सावंत, ॲड.विष्णू ढोले, प्रदीप धापसे, शुभम खंदारे, अशोक पाईकराव, अनिल डंबाळे, बापू धापसे, भीमराव गोरे आदींच्या सह्या आहेत