‘गझलयात्री’ पुरस्कार सोहळा सेलूमध्ये

‘गझलयात्री’ पुरस्कार सोहळा सेलूमध्ये

मराठी गझल मुशायराही रंगणार, नामवंत गझलकारांची उपस्थिती

सेलू/परभणी : स्व.नाना बेरगुडे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘गझलयात्री’ पुरस्कार २०२४ हा परळी वैजनाथ येथील गझलकार दिवाकर जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाना बेरगुडे स्मृती समितीचे अध्यक्ष संजय विटेकर यांनी दिली. २१ डिसेबररोजी सायंकाळी ५.00 वाजता सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत गझलकरांचा मराठी गझल मुशायरा रंगणार असल्याचे श्री.विटेकर यांनी सांगितले.

मानवत येथील नाना बेरगुडे हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गझलकार होते. त्याचे अल्पवयातच निधन झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘गझलयात्री’ पुरस्कार देण्यासाठी नाना बेरगुडे स्मृती समिती स्थापन करण्यात येवून, महाराष्ट्रातील दर्जेदार व सातत्यपूर्ण गझल लिखाण करणाऱ्या गझलकारास दरवर्षी “गझलयात्री” पुरस्कार देण्यात येतो. समितीमार्फत २०१८ पासून पुरस्कार देण्यात येत असून, आत्तापर्यंत जयदीप ‍विघ्ने- देऊळगांवराजा, संजय गोरडे- नाशिक, मारोती मानेमोड-धारणी अमरावती, अल्पना नायक-देशमुख, पुसद व ‍निर्मिती कोलते, पुणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या वर्षीचा ‘गझलयात्री’ पुरस्कार परळी वैजनाथ येथील गझलकार दिवाकर जोशी यांना अंबाजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक दगडू लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित मराठी गझल मुशायऱ्यामध्ये जयदीप ‍विघ्ने (देऊळगांव राजा), संजय गोरडे, (नाशिक), मारोती मानेमोड, (धारणी-अमरावती), अल्पना नायक-देशमुख, (पुसद) आकाश कंकाळ, (नाशिक), शेखर गिरी, (कळंब), गिरीष जोशी, (संभाजीनगर), अंजली दिक्षीत, (संभाजीनगर) व सत्कारमुर्ती दिवाकर जोशी, (परळी वैजनाथ) आधी गझलकार आपल्या बहारदार गझला सादर करणार आहेत. रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!