पॅंथर नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पॅंथर नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

परभणीमध्ये हजारों अनुयायांची अलोट गर्दी

पॅंथर नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

परभणी : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे ( वय ६४ ) यांचे सोमवारी (१६ डिसेंबर) रात्री र्‍हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान, मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता वाकोडे यांच्या पार्थिवावर हजारों अनुयायांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी दिवसभर त्यांचे पार्थिव शहरातील राहुलनगरातील समाज मंदिरासमोरील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निघालेली अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. हजारो अनुयायींच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा स्टेशन रोडमार्गे गांधी पार्क, छत्रपती शिवाजी चौकातून नानलपेठ कॉर्नरवर गेल्यानंतर अपना कॉर्नरमार्गे खंडोबा बाजार स्मशानभूमीत पोहोचली. रात्री सव्वा आठ वाजता आशिष व सिध्दांत वाकोडे या दोन्ही मुलांनी अग्निडाग देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे नेते राहुल प्रधान, खा.संजय जाधव, आ.रोहित पवार, आ.राजू नवघरे, माजी आ.सुरेश वरपूडकर, सुरेशराव गायकवाड, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या पत्नी तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विेशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदींनी वाकोडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली. घटना घडल्या बरोबर ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. दुसर्‍या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोडे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलाने ठिकठिकाणी केलेल्या बळाच्या वापराबद्दल तसेच गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात निषेध केला.

पोलिसांच्या मारहाणीत कारागृहात मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर वाकोडे यांनी आक्रमक भूमिका घेवून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे, अशी मागणी केली होती. तसेच सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंदच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ठाण मांडून वाकोडे यांनी या घटनेत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली. सायंकाळी ६.३० वाजता सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत यात्रेत तसेच अंत्यसंस्कारात सहभाग नोंदवून ते घरी परतत असतांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्याच्या मदतीने वाकोडे यांनी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली, परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

लढवय्ये नेतृत्व हरवले

गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून विजय वाकोडे परिचित होते. पॅंथरच्या चळवळीतून धारदार असे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. त्याकाळी सामाजिक विषमतेच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी होते. दलित पॅंथरनंतर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे कार्य चालू ठेवले. लोकनेते या नावाने त्यांची सार्वजनिक जीवनात ओळख होती. तर प्रेमाने ‘बाबा’ हे संबोधन त्यांना मिळाले होते. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीतील एक लढवय्ये नेतृत्व हरवले आहे, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!