बीड, परभणीच्या घटना अस्वस्थ करणार्‍या

बीड, परभणीच्या घटना अस्वस्थ करणार्‍या

खासदार शरद पवार यांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया, सूर्यवंशी, वाकोडे कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

परभणी : बीड व परभणी येथील दुर्देवी घटना संपूर्ण महाराष्ट्रास अस्वस्थ करणार्‍या आहेत. या दोन्ही घटनांबाबत आपण राज्य सरकारबरोबर चर्चा करीत वस्तुस्थिती निदर्शनास आणून देवू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी, २१ डिसेंबर रोजी परभणीत पत्रकार परिषदेतून दिली. खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत, खासदार पवार यांनी परभणी व बीड या दोन्ही घटना दुर्देवी आहेत. खूप अस्वस्थ करणार्‍या आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी हे चांगलं नाही. महाराष्ट्र या दोन्ही घटनांनी हादरला आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांबद्दल गांभीर्याने विचारमंथन व कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण राज्य सरकारबरोबर चर्चा करु; तसेच वस्तूस्थिती निदर्शनास आणू, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीचा दौरा करण्यापूर्वी कठोर कारवाई संदर्भात पाऊले उचलावीत, असा सल्ला पवार यांनी दिला. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार फौजिया खान, माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे, तहेसीन अहेमद खान, माजी आमदार सुरेश वरपुडकर, सुरेश देशमुख, विजय भांबळे, बाबाजानी दुर्राणी तसेच प्रा.किरण सोनटक्के, भगवानराव वाघमारे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, किरण सोनटक्के, डॉ.अनिल कांबळे, रमाकांत कुलकर्णी, बाबुराव घाटुळ आदी उपस्थित होते.

सूर्यवंशी, वाकोडे कुटुंबियांचे सांत्वन

खासदार शरद पवार शनिवारी, २१ डिसेंबर रोजी दुपारी परभणी दौऱ्यावर आले होते. शहरातील स्टेशन रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून त्या ठिकाणी झालेल्या भारतीय संविधान प्रतिकृती अवमान घटनेची माहिती घेतली. दरम्यान, खासदार पवार यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेवून त्याचे सांत्वन केले. या भेटी दरम्यान सुर्यवंशी कुटूंबियांनी विधी महाविद्यालयात शिक्षण घेऊन वकील होवू इच्छिणार्‍या सोमनाथ याचा या पध्दतीने मृत्यू व्हावा, या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी हेतुतः सोमनाथ यास दगडफेकीच्या घटनांमध्ये आरोपी केले. विविध कलमे लावली. गुन्हेगारासारखी वागणूक दिली. कोठडीत मारहाण केली. त्यामुळेच सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला. या प्रकरणात आम्हास न्याय हवा आहे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, ज्येष्ठ नेते पवार यांनी आपण संपूर्ण वस्तूस्थिती जाणून घेतली आहे. निश्‍चितच कुटूंबियांना न्याय मिळण्या संदर्भात सर्वार्थाने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. आंबेडकरी नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देवून वाकोडे कुटुंबीयांचे देखील खासदार पवार सांत्वन केले. यावेळी वाकोडे परिवारातील सदस्यांनी घडलेल्या घटने संदर्भात सविस्तर माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक वाकोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. वास्तविक संपूर्ण आंदोलन शांततेने हाताळण्याकरीता वाकोडे प्रयत्न करत होते. एकंदरीत घडलेल्या घटनेतून, ताणतणावातून आणि पोलीस प्रशासनाने सुरु केलेल्या कठोर कारवाईमुळेच ते अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, असेही सदस्यांनी नमूद केले. आमच्या परिवाराचे ते कर्ते पुरुष होते. त्यामुळे शासनाच्या वतीने आर्थिक मदत व्हावी आणि एक सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, असे नमूद केले. दरम्यान, खासदार पवार यांनी सर्व बाबी ऐकून सर्वोतोपरी मदत केली जाईल, राज्य सरकारबरोबर चर्चा केली जाईल, आम्ही आपल्या परिवारासोबत आहोत, न्याय मिळवून देवू, असे म्हटले. यावेळी अलकाताई विजय वाकोडे, मुलगा आशिष वाकोडे, सिद्धांत वाकोडे, मुलगी प्रियांका वाकोडे, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, सून शितल वाकोडे तसेच बंधू सुरेश वाकोडे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी खासदार पवार यांच्याशी हितगुज साधले. या वेळी राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार डॉ.फौजिया खान, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲड.विजय गव्हाणे, माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!