दिवाकर जोशी यांना गझलयात्री पुरस्कार प्रदान
सेलूमध्ये रंगला मराठी गझल मुशायरा
सेलू : नाना बेरगुडे स्मृती समिती सेलूच्या वतीने दिल्या जाणारा गझलयात्री पुरस्कार परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांना प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार, २१ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला.
येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक दगडू दादा लोमटे होते. याप्रसंगी बोलताना डॉ.विनायकराव कोठेकर यांनी गझल या प्रकारातील मराठीतील प्रारंभाच्या गझलकारापासून ते सुरेश भट व आजच्या गझलकार यांच्यापर्यंतच्या गझल लिखाणाची विस्तृत माहिती विशद केली. सज्जन माणसाच्या नावाने हा पुरस्कार दिला जात असून तो जिवंत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात दगडू लोमटे म्हणाले की, अंबेजोगाई आणि सेलूचे तसे पूर्वीपासूनचे एक भावनिक नाते असून दोन्ही शहरांनी शैक्षणिक व सामाजिक वारसा जपलेला आहे.नाना बेरगुडे यांनी ताकदीच्या गझल लिहिलेल्या आहेत. आणि त्यातूनच त्यांचं जगणं प्रेरणा देते.
या प्रसंगी नाना बेरगुडे स्मृती समिती सेलूचे अध्यक्ष संजय विटेकर व अश्विनी विटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर गझलकारांनी आपापल्या उत्कृष्ट गझल सादर केल्या त्यांना रसिक मान्यवरांनी चांगलीच दाद दिली. उपस्थित मान्यवर गझलकारांचे स्वागत रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, भालचंद्र कोठेकर, मोहन खापरखुंटीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव आगजाळ, अजित मंडलिक, गंगाधर गुंजकर, प्रवीण माणकेश्वर आदींनी प्रयत्न केले.