राहुल गांधी यांच्याकडून वाकोडे कुटूंबियांचे सांत्वन
परभणी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी, २३ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. कुटुंबातील सदस्यांबरोबर संवाद साधत माहिती घेतली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक विजय वाकोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे आंदोलन हाताळताना त्यांनी शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. मात्र घडलेल्या घटनेबद्दल त्यांना झालेला ताणतणाव आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईने ते अस्वस्थ होते, त्यामुळेच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, वाकोडे कुटुंबियांना न्याय मिळवून देवू, असा विश्वास गांधी यांनी दिला. या वेळी पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोडे, मुलगा आशिष वाकोडे, सिद्धांत वाकोडे, मुलगी प्रियांका वाकोडे, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, शितल वाकोडे, सुरेश वाकोडे यांच्यासह परिवारातील सदस्य काँग्रेसचे नेते उपस्थित होते.