‘नूतन’ची माजी विद्यार्थिनी हाच स्वर्णमयी पुरस्कार
विविध क्षेत्रातील विद्यार्थिनींचे मत, नूतन कन्या प्रशालेचा माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात
लोकाश्रय हाच नूतन शिक्षण संस्थेचा आधार : डी.के.देशपांडेगुरुजी
सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेची आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी हाच स्वर्णमयी पुरस्कार असल्याचे विविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थिनींनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २८, २९ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आयोजित मार्गदर्शन, मुक्तचिंतन, सुसंवाद, मनोगत आदी विविध कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थिनींनी आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या. रविवारी उद्घाटन प्रसंगी बोलताना पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी प्रा.डॉ.इच्छा शिंदे म्हणाल्या, ” अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानांच नूतन कन्या प्रशालेने माणूस घडविण्याची जीवनमूल्ये रूजवली. म्हणूनच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वाभिमानाने उभे आहोत.”
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, प्रकाशचंद्र बिनायके, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेश गुप्ता, मुख्याध्यापिका निशा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्वर्णमयी सभागृहाच्या बांधकामासाठी माजी विद्यार्थिनींनी देणगी जाहीर करीत कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या वेळी उद्योजक रामेश्वर राठी, अजित बिनायके, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, उज्वला लड्डा, मालिनी वाघोलीकर, माजी विद्यार्थिनी रमा काबरा आदींची उपस्थिती होती. दुपारी चार वाजता मुक्तचिंतन व समारोप झाला.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्था पदाधिकारी व सदस्यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, दत्तात्रय घोगरे, संगीता खराबे, सुषमा दामा, रेणुका आंबेकर, शशिकांत देशपांडे, सतीश कुंडीकर, शंकर बोधनापोड, उपेंद्र दिवाळकर, कैलास मलवडे, सुहास देऊळगावकर, नागेश देशमुख, भालचंद्र गांजापुरकर, यशवंत कुलकर्णी, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण, जयश्री कुंभकर्ण, बाबासाहेब थोरे आदींसह विविध समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विविध कार्यक्रमांतून जागवल्या शालेय आठवणी
मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन स्मिता बोरीकर, रिना ठाकूर यांच्या हस्ते झाले. गप्पा गोष्टी, शालेय परिसर, वर्ग पाहात, शिक्षकांशी हितगुज साधत आणि विविध खेळांच्या माध्यमातून माजी विद्यार्थिनींनी शालेय आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकत विद्यार्थिनींनी नृत्य, गायन, एकपात्री प्रयोग आदींच्या सादरीकरणातून मनोसोक्त आनंद घेतला . ‘आम्ही कशा घडलो’ या विषयावरील संवादातून भाव विश्व उलगडले. डॉ.अनघा वैद्य, रश्मी काला, डॉ.अंजली भाबट, डॉ.रूपाली भारस्वाडकर, डॉ.मधुरा आनंदगावकर, भावना काबरा इंजिनियर प्रीती लोया, श्रेया भराडिया तसेच स्वरा देशपांडे, समीक्षा कुलकर्णी आदी विद्यार्थिनींनी विचार मांडले.
लोकाश्रय हाच नूतन शिक्षण संस्थेचा आधार
सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थिनीं मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांनी सुखी राहा, प्रगतीचे शिखरे पादाक्रांत करा, असे आशीर्वादरूपी आवाहन माजी विद्यार्थिनींना केले. तर समारोपप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरूजी म्हणाले, ” १९३९ मध्ये सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेची स्थापना झाली. केजी टू पीजी पर्यंत शिक्षण उपलब्ध करून देत असलेल्या या संस्थेच्या वाटचालीत आणि जडणघडणीत गेल्या ८५ वर्षांपासून लोकाश्रय हाच मुख्य आधार राहिला आहे.”