शेतीच्या वादातून घडला प्रकार
गंगाखेड : गंगाखेड (जि.परभणी) तालुक्यातील बन पिंपळा येथील एका ६२ वर्षीय शेतकरी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यासह अन्य विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत शेतकऱ्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. बन पिंपळा शिवारात सर्वे नंबर सहा/तीन मध्ये साडेतीन एकर शेत जमीन मोठ्या मुलाच्या नावे आहे. या जमीनीबाबत आमदार रत्नाकर गुट्टे, बाबा पोले व हनुमान लटपटे या तिघां सोबत गेल्या दहा वर्षापासून वाद असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवारी (२० मे) सकाळी दहा ते अकराव्या सुमारास शेतात काम करीत असतांना आमदार गुट्टे, पोले, लटपटे यांच्यासह इतर तीस ते पस्तीस अज्ञात इसम तीन बोलेरो जीप, ट्रॅक्टरसह शेतामध्ये आले. “या शेतातून तुम्ही निघून जा, हे शेत आमचे आहे. तुम्ही जर निघून गेला नाहीत, तर आम्ही तुम्हाला याच शेतामध्ये जेसीबीने खड्डा खोदून पुरून टाकू,” अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. डावा हात धरून पिनगळला. विनयभंग केला. “शेती सोडा नाहीतर, तुमच्यावर ॲट्रॉसीटीचे सारखे खोटे गुन्हे दाखल करू व कुटूंबातील सर्वांना जिवे मारून टाकू,” अशी धमकी दिली. आमदार गुट्टे हे मारहाण करून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील माने तपास करीत आहेत. दरम्यान, कर्तव्यदक्ष व संवेदनशील आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर राजकीय दबावापोटी, एका जमीन प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे निवेदन आमदार गुट्टे समर्थकांनी गंगाखेडच्या तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना दिले आहे. ( वार्ताहर : एम.बी.भिसे, गंगाखेड)