छायाताई मुंदडा यांना ‘परभणी भूषण’ पुरस्कार

छायाताई मुंदडा यांना ‘परभणी भूषण’ पुरस्कार

परभणीत मान्यवरांच्या उपस्थितीत आज वितरण

 

परभणी : ‘झरीकर मसाले’ हा ब्रँड निर्माण करणार्‍या यशस्वी महिला उद्योजिका छायाताई अशोककुमार मुंदडा यांना या वर्षीचा ‘परभणी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी, १ जानेवारीरोजी सायंकाळी सहा वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

याप्रसंगी सोलापूर येथील ‘उद्योगवर्धीनी’च्या संस्थापिका चंद्रीका शंभुसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे असतील. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. रोख रक्कम, स्मृृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन गोदातीर समाचार व पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

‘झरीकर मसाले’चा तीन दशकांचा प्रवास

श्रीमती मुंदडा यांनी छाया महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून ‘झरीकर मसाले’ची सुरुवात केली. सुरुवातीला घरगुती पध्दतीचा मसाला तयार करून या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. गेल्या तीस वर्षात त्यांच्या या व्यवसायाचा मोठा उत्कर्ष झाला आहे. ‘प्रदीप’ व ‘झरीकर मसाले’ या नावाने सुरु केलेल्या व्यवसायाची २० कोटीहून अधिक वार्षीक उलाढाल आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने गुणवत्तापूर्ण मसाल्याची निर्मिती करणार्‍या या उद्योगामुळे अनेक महिला व तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

मसाल्याचे तब्बल ४१ हून अधिक प्रकार उत्पादीत करणार्‍या या उद्योगाने आता राज्याबाहेरही आपले जाळे विस्तारले आहे. निर्यातक्षम उत्पादनाची निर्मिती करण्याकडे सध्या या उद्योगाचा कल आहे. श्रीमती मुंदडा यांच्या गोपाल व मंगेश या दोन्ही मुलांनी आता या उद्योगाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तीस वर्षापूर्वी केवळ काही किलोच्या माध्यमातून मसाल्याची निर्मिती करणार्‍या श्रीमती छायाताई मुंदडा यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!