परभणीतील तबलिगी इज्तेमानिमित्त वाहतूक मार्गात बदल
परभणी : येथील जिंतूर रोड बायपासजवळ वार्षिकी तबलिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिंतूरकडून जिंतूर रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहतूक तसेच पाथरी रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहने व सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरातून पाथरी – जिंतूरकडे जाणारी अवजड वाहनांचे वाहतुकीस गुरुवारी( २ जानेवारी ) सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यतच्या कालावधीसाठी अवजड वाहनांच्या रहदारीसाठी वाहतूक मार्ग बंद करण्यात येत आहे. पाथरी रोडकडून परभणीकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी मानवत, पाथरी, उमरी फाटा या पर्यायी वळण रस्त्याचा वापर करावा तसेच गंगाखेड कडून सिंगणापूर फाटामार्गे परभणी शहरात येऊन जिंतूर किंवा मंठा व मानवतकडे जाणारी सर्व प्रकारच्या जड वाहनांनी परभणी शहरात न येता, उमरी फाटा, पाथरी, मानवत, देगाव फाटामार्गे जिंतूरकडे जाणाऱ्या रस्ताचा वापर करावा. जिंतूरकडून परभणीकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी कौसडी फाटा, वालूर, मानवत, पाथरी, पोखर्णी फाटा, उमरी फाटा या मार्गाचा वापर करावा. जालना, मंठ्याकडून परभणी शहरात येणारी अवजड वाहने देवगाव फाटा येथून सेलू, मानवत, पाथरी, पोखर्णी फाटा, उमरी फाटा या रस्त्याचा वापर करावा, असे पोलिस प्रशासनाने कळविले आहे.