जीवनात सेवावृत्तीची जोपासना करावी
घोडके पिंपरी येथील संतपूजन सोहळ्यात अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे मत
रात्री बारा वाजता एटीएममधून पैसे काढता येतील, पण जीवाभावाची माणसे नाही काढता येणार. त्यामुळे आपले दु:ख नि:संकोचपणे व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला एखादा तरी चांगला मित्र असणे आणि माणसे जोडण्याची कला जोपसणे आवश्यक आहे. कुटुंबात पती-पत्नी आणि मुलांमध्ये सकारात्मक सुसंवाद असला, तर कोणीही एकटे पडणार नाही आणि आत्महत्येसारख्या घटना आपण टाळू शकू, असे अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी या वेळी सांगितले.
सेलू/परभणी : आईवडिल आणि संतसेवापेक्षा मोठी सेवा नाही, याच सेवेचा भगवंतही गौरव करतात. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात सेवावृत्तीची जोपसना करावी, असे आशीर्वचनपर मत अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी गुरुवारी, २ जानेवारी रोजी व्यक्त केले.
आरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसाद घोडके व भगवानराव घोडके परिवाराच्या वतीने बापूराव आणि पंचफुला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घोडके पिंपरी (ता.सेलू) येथे संतपूजन सोहळा झाला. संत तुकाराम महाराज यांच्या ” आुपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया ” या अंभगावर कीर्तन करतांना दस्तापुरकर महाराजांनी संतसेवेचे महत्त्व सांगितले. जे आचार-विचाराला जागे आहेत. श्रवण करतात आणि अखंड चिंतन करतात. अशांच्या सेवेचा संत तुकाराम महाराजांचा आग्रह आहे, असे ते म्हणाले. गोकुळनाथ आणि नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साथसंगत केली.
या वेळी नामदेव महाराज ढवळे, राम महाराज काजळे, अच्युत महाराज दस्तापुरकर, रमेश महाराज, कालिदास महाराज अवलगावकर, मोहिते नाना, परमेश्वर महाराज, जयराम महाराज तांगडे, सारंगधर महाराज, विष्णु महाराज माघाडे, मारुती महाराज वाघ, परमेश्वर महाराज आदींचा यथोचित सन्मान रामप्रसाद घोडके यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी अंबादास घोडके, राजेंद्र घोडके, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, सभापती अशोक काकडे, सुरेश भुमरे, डॉ.केदार खटिंग, दत्तराव पावडे, पांडुरंग मगर, मधुकर पौळ, रघुनाथ बागल आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.