वेतनाअभावी सेलू बाजार समितीचे कर्मचारी त्रस्त
सचिवासह कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले
सेलू / परभणी : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या वर्षभरापासून अनियमित होत आहे. सहासहा महिने वेतन थकत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कापूस हंगामातसुद्धा तीन महिन्यांपासून वेतन पुन्हा थकले आहे.
सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सचिव, सहसचिव यासह एकूण २२ कर्मचारी आहेत. त्यांचे माहे मे ते ऑक्टोबर २०२४ या सहा महिन्यांचे वेतन थकले होते. दिवाळीच्या तोंडावर पाच महिन्यांचे वेतन काढण्यात आले. मात्र, पुन्हा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे; तसेच मे २०२४ ते सप्टेंबर २०२४ या पाच महिन्यांचा बँक भरणा व कर्मचारी अंशदान पूर्ण भरणा बाकी आहे.
कापूस हंगाम २०२४-२५ चालू असून कर्मचारी वर्ग या साठी परिश्रम घेत आहेत. तसेच बाजार समितीकडे भरपूर निधी उपलब्ध असून सुध्दा कर्मचार्यांचे वेतन अदा केलेले नाही. या मुळे कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी आहे. बाजार समितीचे सचिव यांच्याकडे नियमित वेतन अदा करण्याबाबत वारंवार मागणी केली. पाठपुरावा केला. परंतु, अद्यापही वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे; तसेच बँकेचे हप्ते थकल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. मुलांचे शिक्षण, आजारपण यासाठी उधार उसनवारी करून तसेच खासगी सावकाराकडून कर्ज काढून जिविका भागवावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
थकीत तीन महिन्याचे तत्काळ अदा करावे तसेच पुढील वेतन नियमितपणे करावे, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांसह सहायक उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बाजार समितीचे सचिव आर.आर.वाघ, सहसचिव डी.एम.शिंगणे, एन.सी.आजबे, व्ही.व्ही.हिंगे, ए.आर.राउत, ए.एम.बेले, एस.एस. गायकवाड, बी.एम.गायकवाड, एस.एन.देशमुख, ए.एस.वाटोडे, एस.पी.चौहान, एस.डी.खंडागळे, जी.डी.शिंदे, स्वप्नीता रेद्देवार, आर.डी.गोरे, डी.आर.ताठे, आर.पी.घोगरे, आर.टी.कवडे, डी.के.सपकाळ, शेख सितारा, व्ही.एम.मोरे, के.पी.गंलाडे आदींसह कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत