धावत्या बसने अचानक घेतला पेट
गंगाखेड : दैठणा परिसरातील घटना, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
परभणी : तालुक्यातील दैठणा शिवारात धावत्या बसने अचानकपणे पेट घेतला. परंतु, चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ गाडी थांबवली व प्रवाशांना तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गंगाखेड – परभणी महामार्गावर गुरुवारी, ९ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. गंगाखेडहून परभणीला जाणार्या या बसमध्ये ३० प्रवासी होते.
गंगाखेड आगाराची कोद्री मार्गे लातूर जाणारी मुक्कामी बस क्रमांक एम.एच. २० बी.एल २६९१ ही बस गुरुवार ९ जानेवारी रोजी सकाळी लातूर येथून कोद्री, गंगाखेड मार्गे परभणीकडे निघाली असता गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील रुमणा पाटी जवळील दैठणा गोलाई जवळ पोहचली असता चालक महादेव मुंडे यांना इंजिन मधून धूर निघत असल्याचे व काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ रस्त्याच्या बाजूला बस थांबवून खाली उतरुन पाहणी केली असता अचानक रेडिएटरने पेट घेतला. तेंव्हा त्यांनी वाहक चंद्रकांत नोमुलवार यांना जोरात आवाज देऊन प्रवाशांना खाली उतरविण्यास सांगितले. प्रवाशी उतरे पर्यंत चालकाच्या कॅबिनने पेट घेतल्याने बसमध्ये धुरच धूर झाला. चालकाने आवाज देताचपरिसरातील शेतकरी लक्ष्मण कच्छवे, आश्विन कच्छवे, सुरज कच्छवे, इस्माईल इनामदार आदींसह ग्रामस्थांनी दुचाकीवर पाणी आणत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली व बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून परभणीकडे रवाना केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेईपर्यंत आग आटोक्यात आली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३० प्रवाशांचे प्राण वाचले व पुढील अनर्थ टळला.