सोन्याच्या शिक्याच्या आमिषाने दहा लाखांला गंडविले
जिंतूर तालुक्यातील बोरीतील सराफा व्यापाऱ्यास दहा लाखांचा चुना
बोरी ता.जिंतूर : सोन्याचे शिक्के कमी दरात देऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी सराफा व्यापारी व त्याच्या सहकाऱ्यास त्यांच्या जवळील नगदी १० लाख ५ हजार रुपये व मोबाईल लुटून नेल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत बोरी येथील पोलीस ठाण्यत आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
बोरी येथील पोलीस ठाण्यात मारोती कृष्णा कोळेकर यांनी या प्रकरणाबाबत फिर्याद दाखल केली आहे. कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी संगणमत करून अगोदर विश्वास संपादित केला आणि नंतर लुटमार केल्याचे नमूद केले आहे. आरोपींनी सराफा व्यापाऱ्यास बोरी ते वाघी रोडवर एकांत ठिकाणी बोलावले फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथे आल्यानंतर आरोपींनी संगणमत करून त्यांच्याकडील पिशवीमध्ये असलेले दहा लाख रुपये नगदी सहकार्याकडील ५ हजार रुपये आणि ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल यांची लुटमार केली. लुटमारीला विरोध करताच आरोपींनी या दोघांना मारहाण व शिवीगाळ केली आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी बोरीच्या पोलीस ठाण्यात अजय धनराज भालेराव, विठ्ठल राम ससाने, विनोद शेषराव डांगे, कालू पारधी, तीन अनोळखी इसम व एक अनोळखी महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सपोनि सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवून बोरीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आरोपींना ताब्यात घेतले. तर परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी परभणी तालुक्यातील तीन आरोपींना दोन मोबाईल सह ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपींकडून ८ लाख ५० हजार रुपये आणि दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.