परभणी : सेलू तालुक्यातील मोरेगाव ते साळेगाव रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी करीत, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, सोमवारी ( २३ मे) सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्याच्या कक्षाच्या बंद दरवाज्याला निवेदन चिकटवून देत आंदोलन केले. साळेगावपाटी ते मोरेगावपर्यंतचा रस्ता,जेसीबीने खोदून मोठ मोठ्ठे खड्डे केलेले आहेत. त्यावर जाड खडी टाकली. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खडी टाकून गुत्तेदार फरार आहे. खड्ड्यांच्या रस्त्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. किरकोळ अपघातात जखमी होत आहेत. येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत; अन्यथा खड्ड्यामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, नागेश ठाकूर, संदीप बोकन, अर्जुन बोरुळ, दत्ता पवार, शरद आकात, महिंद्रा गाडे, सतिश काकडे, विजय नाईक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.