साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, २० जुगारी ताब्यात
परभणी : सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील, गोविंदा लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थाच्या हॉलमध्ये, गेल्या काही वर्षांपासून दिवसरात्र खुलेआम सुरू असलेल्या बहुचर्चित जुगार अड्ड्यावर, पोलिसांनी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास धाड टाकली. २० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, रोख रक्कमेसह ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनेक तक्रारीनंतर या जुगार अड्ड्याचे पितळ अखेर उघडं पडलं आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोविंदा लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थेच्या कार्यालयावर धाड टाकली. येथील हॉलमध्ये २० व्यक्ती ४ गोलाकार टेबलवर तिरट नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. तर ५० हजार ४५० रोख, १७ मोबाईल, ८ दुचाकी असा एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २१ आरोपींविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्ड्याचा चालक-मालक भाऊराव विठ्ठलराव सोनवणे ( रा.सेलू) वगळता, वीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक जटाळ पुढील तपास करीत आहेत. ताब्यातील आरोपींची नावे अशी : शिरीष नारायण पांडे, विठ्ठल गंगाधर आकात, सुनिल माणिकराव राजुरकर, गणेश दत्तराव सवने, सुनिल अंकुश टाके, शिवाजी बाबूराव खेडकर, बाबासाहेब मुंजाजी मोळे, अशोक गुलाबराव खुपसे, दिगंबर गोविंद शेरे, उत्तम काशिनाथ डंबाळे ( सर्व रा.सेलू), भारत रावसाहेब घाटगे, शेख जाफर शेख उस्मान, लक्ष्मण भागवत खंडीग, मनसब मो.सुलतान, मतीन खान चांदखान, विनोद सोपानरा इब्राहीम खान अमानउल्ला खान, शेख बडेखाब शेख कासीम, ( सर्व रा.परभणी), बबन कचरूबा शिरसाट, दिनकर विनायकराव सोळंके ( रा.कुपटा ). दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच सेलूतील साई सेवाभावी संस्थेच्या खोल्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून २५ लाखांच्या मुद्देमाल जप्त करीत, ४४ जणांना ताब्यात घेतले होते.
…