सेलूतील विरशैव स्मशानभूमीचे सपाटीकरण करा
शिवा संघटनेची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सेलू : येथील सर्व्हेनंबर ३३ मधील विरशैव स्मशान भूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मृतदेहाचा दफनविधी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे लेव्हलिंग करून समतल सपाटीकरण करावे, अशी मागणी अखिल भारतीय शिवा विरशैव संघटनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे २० जानेवारीरोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमीत अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाढलेली काटेरी झाडे, चिल्हारीची काटेरी झुडपे, नाल्याचे पाणी घुसल्याने निर्माण झालेली दलदल यामुळे मृतदेहाचा दफनविधी करणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे डोजर अथवा ट्रॅक्टर अर्थमुव्हरच्या सहाय्याने जागेचे सपाटीकरण करून वाढलेली अनावश्यक काटेरी झाडे नष्ट करावी, श्रद्धांजली सभागृहाची स्वच्छता व साफसफाई करावी, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुक्तीधाम योजने अंतर्गत विरशैव स्मशानभूमी साठी २ एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजलिंग अप्पा तरडगे, सखाराम कानडे, देवराव चौरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.