कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
सेलू : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये मकर संक्राती सणाचे औचित्य साधून दीडशे मुलींसाठी तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी, २४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव शेळके, मुख्याध्यापिका सुनीता वेडे, गृहप्रमुख प्रेरणा पवार, प्रजापिता ईश्वरीय विद्यालय सेलू येथील बहन वैशाली यांची उपस्थिती होती.
यावेळी बहन वैशाली यांनी बालिकांना मकर संक्रांती सणाचे महत्व, भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, तिळगुळ वाटपाचे महत्त्व काय आहे,तिमिरातूनी तेजाकडे जाताना आवश्यक असणारी शिदोरी याबरोबरच चांगल्या सवयी अंगी जोपासण्याचे आवाहन बालिकांना केले. यावेळी चंद्रभागा प्रल्हादराव शेळके यांनी दीडशे बालिकांना पेन, तिळगुळ आणि मेहंदी कोन तर शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी डायरी, पेन आणि तिळगुळाचे वाटप केले. सूत्रसंचालन कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी केले. आभार वृषाली साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता राऊत, सुहास नवले, शिवाजी कोकर, उषा लोंढे,अपर्णा काळे, शिवमाला मोरे यांनी परिश्रम घेतले