वीर गाथा 4.0 : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी चमकले
सेलू : गॅलंट्री पुरस्कार विजेत्यांच्या शौर्यकथांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करून त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी “वीर गाथा प्रकल्प” 2021 मध्ये सुरू करण्यात आला. संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना काव्य, निबंध, चित्रकला, मल्टिमीडिया सादरीकरण इत्यादी माध्यमांतून सर्जनशील प्रकल्प सादर करण्याची संधी मिळते. प्रकल्पाच्या यशस्वी प्रवासाचा एक भाग म्हणून “वीर गाथा 4.0-2024-25 या शैक्षणिक वर्षात राबवण्यात आला. याच प्रकल्पांतर्गत श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परभणी जिल्ह्यात भरीव कामगिरी केली आहे.
तिसरी ते पाचवी वयोगट श्रेणीमध्ये वर्ग पाचवीची विद्यार्थिनी अंशिका नारायण चौरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.नववी ते दहावी वयोगट श्रेणीमध्ये वर्ग दहावीची विद्यार्थिनी समृद्धी वरकड हिने प्रथम क्रमांक मिळवला. परभणी जिल्ह्यातून तीन वयोगट श्रेणींमध्ये सहभागी झालेल्या शाळांपैकी,एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ने दोन वयोगट श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या शाळेचा व संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “वीर गाथा” प्रकल्पाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि सर्जनशीलतेची भावना निर्माण केली असून, या प्रकल्पाचा सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण उपयोग होत आहे.