स्वप्ने दाखवून जनतेला महागाईत लोटले

परभणीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

परभणी : गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेला केवळ स्वप्ने दाखविण्याचे काम करीत, प्रचंड महागाईत लोटले आहे. अन्नधान्य,अ‍ॅनिमिया, हंगर इंडेक्स खूप खाली आला आहे. शिक्षण, सामाजिक क्षेत्रांतही घसरण सुरु असून गरिबीत कमी येत नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुळे शुक्रवारी (२७ मे) परभणी दौऱ्यावर आल्या होत्या. दुपारी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. या वेळी खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, बसवराज पाटील नागराळकर, अ‍ॅड.विजय गव्हाणे, प्रताप देशमुख, प्रा.किरण सोनटक्के, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, भावना नखाते, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, इम्रान हुसैंनी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महाविकास आघाडीने एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून राज्यात जन्मणार्‍या प्रत्येक बाळाची पहिल्या चोवीस तासांत तपासणी केली जाईल. जेणेकरुन पुढे त्यात दिव्यांगत्व आढळले, तर ते अधिक गंभीर स्वरुपाचे नसेल. हा उपक्रम जिल्हा, तालुका, गाव-वस्तीपर्यंत राबवला जाणार असल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न, पाऊले उचलल्याचे त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीने राबविलेल्या धोरणामुळे दिव्यांगांना मोठी मदत मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भोंग्यांच्या राजकारणावर, ‘ करायला गेलो एक आणि झाले दुसरेच’ अशी स्थिती असल्याचे मत व्यक्त करून, शिर्डीसारख्या देवस्थांनाना याचा फटका बसला, मात्र इतरत्र कुठे भोंगे उतरल्याचे दिसले नाही, असे सुळे यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षण प्रश्नावरुन केंद्रात सावळागोंधळ सुरु असून मध्यप्रदेश सरकारने असा कुठलाही डाटा दिलेला नाही. मी मध्यप्रदेशची ऑर्डर वाचली असून ती शंभर टक्के ऑर्डर नसल्याचा दावा खासदार सुळे यांनी केला आहे. राज्यात रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा नव्याने लवकरच घेण्यात येणार आहेत. दोन वर्षे कोव्हीडमध्ये गेल्याने विविध खात्यातील नोकरभरती थांबली होती, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात नाफेडची खरेदी अचानक बंद झाल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण झालेली असून याबाबत आम्ही केद्राकडे पाठपुरावा करत आहोत, असे त्या म्हणाल्या.

दिव्यांगांना मोफत श्रवणयंत्र वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि सामाजिक न्यायमंत्री तथा  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (२७ मे) दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार डॉ.फौजिया खान, बसवराज पाटील नागराळकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, संयोजक विजय कान्हेकर, संतोष मुंढे, माजी खा.सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस माजी आ.विजय गव्हाणे, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष   प्रा.किरण सोनटक्के, भावना नखाते आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!