खासदार सुप्रिया सुळे, प्रेक्षा भांबळे यांची उपस्थिती
सेलू (जि.परभणी) : बालविवाहाची प्रथा मोडून काढण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा विजयराव भांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व युवतींनी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बालविवाह रोखण्याची शपथ घेतली.
शुक्रवारी (२७ मे) परभणी येथील राष्ट्रवादी भवनात हा कार्यक्रम झाला. या वेळी ” आम्ही माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाईच्या लेकी, कोणत्याही परिस्थितीत आम्ही बालविवाह करणार नाहीत. बालविवाह ही कुप्रथा आहे. अशी कुप्रथा बंद करणार आहोत. वयाच्या अठरा वर्षानंतरच विवाह करू. बालविवाहामुळे आरोग्यविषयक अडचणी निर्माण होणार असून, यामुळे उज्ज्वल भविष्यकाळ उद्ध्वस्त होऊ शकतो. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याची आम्हाला जाण आहे.” अशी शपथ खासदार सुप्रिया सुळे यांना साक्षी ठेवून घेतली.
फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला समतेचे तत्त्व दिले. कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम कायदा केला, हा आपला वारसा आहे. महाविकास आघाडी सरकारने विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी अतिशय महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत परभणी जिल्ह्यातून देखील चांगला प्रतिसाद मिळेल.
परभणी जिल्ह्यात काही बालविवाह झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांनी आपल्या मुलांचे बालविवाह करू नये, यासाठी प्रत्येकाने शपथ घ्यावी की, मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही आणि १८ वर्षापेक्षा लहान सुन ही घरात आणणार नाही. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले. खासदार फौजिया खान, भावना नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिंतूर तालुका अध्यक्ष मनीषा केंद्रे, निर्मला लिपणे, सेलू आदींची उपस्थिती होती.
…