ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात तरुणाई एकवटली
सेलू (जि.परभणी) : बारव स्वच्छता मोहिमेने परभणी जिल्ह्यात जोर घेतला असून, सेलू तालुक्यातील रायपूर येथील ऐतिहासिक बारव श्रमदानातून पुन्हा एकदा लख्खं झाली आहे. लॉकडाऊनमध्ये तरुणांच्या पुढाकाराने दीड महिन्यात (फेब्रुवारी २०२१) ग्रामस्थांनी श्रमदान करीत, सुमारे चाळीस फूट खोल ही बारव प्रथमतः पुनर्जीवित केली होती. परंतु दरम्यानच्या काळात पावसामुळे बारवेमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला. तो काढण्यासाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात तरुणाई, ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले.
श्री रायरेश्वर महादेव मंदिराजवळील या प्राचीन बारवेतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (२८ मे) उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते करण्यात करण्यात आला. सकाळी दहा वाजेपर्यत बारवेची साफसफाई व गाळ काढण्यासाठी ६० ग्रामस्थांनी श्रमदान केले. श्रमदानानंतर संगेवार यांनी ग्रामस्थांसमवेत गुळ व भाजलेल्या भुईमूग शेंगांचा आस्वाद घेतला. सरपंच शांताबाई हिंगे यांच्या हस्ते संगेवार यांचा सत्कार करण्यात आला. श्रमदानात दादासाहेब गाडेकर, लक्ष्मणराव गाडेकर, जिजाबाई हिंगे, पांडुरंग हिंगे, वैभव गाडेकर, माणिकराव काजळे, राजेंद्र गाडेकर, शाम गाडेकर, सचिन गाडेकर, पांडुरंग सोळंके, अप्पासाहेब गाडेकर, अशोक गायकवाड, अमोल गाडेकर, राजाभाऊ गाडेकर आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
***