समिती सदस्य छगन शेरे यांची माहिती, देशभरातील शिवभक्तांची उपस्थिती
परभणी : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्यावतीने, ५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष तथा सोहळा समितीचे सदस्य छगन शेरे यांनी रविवारी ( २९ मे) ही माहिती दिली. समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खर्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन. तो ‘ राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने दरवर्षी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदा पाच जूनला ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम आहे. सहा जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा” या मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारासह सर्व धर्मीय सहभागी होऊन पारंपरिक लोककलांचा जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. देशभरातून इतिहास संशोधक,अभ्यासक, शिवभक्त, इतिहास प्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेरे यांनी केले आहे.
सोहळ्याची रुपरेषा :
पाच जून : दुपारी ४:०० वाजता : युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व पायी गड चालण्यास प्रारंभ स्थळ : चित्त दरवाजा सायंकाळी ५:०० वाजता : गडपूजन, २१ गावांतीन सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उपस्थितीत, स्थळ : नगारखाना ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ कार्यक्रम : स्थळ : होळीचा माळ. सायंकाळी ६:०० वाजता : ‘गतवैभव रायगडाचे, कार्य रायगड विकास प्राधिकरणाचे’ यावर विस्तृत सादरीकरण, स्थळ : हत्तीखाना सायंकाळी ७:०० वाजता : जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा, सोहळा पालखीचा, स्थळ : राजदरबार, रात्री ९:०० वाजता : गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ स्थळ : शिरकाई मंदिर, रात्री ९:३० वाजता : जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती स्थळ : जगदीश्वर मंदिर, रात्री ९:०० वाजता : अन्नछत्र, स्थळ : जिल्हा परिषद धर्मशाळा आणि पायथा. सहा जून : सकाळी ६:०० वाजता : ध्वज पूजन, ध्वजारोहण व जयघोष रणवाद्यांचा स्थळ : नगारखाना, सकाळी ६:५० वाजता : शाहिरी कार्यक्रम, स्थळ : राज दरबार, सकाळी ९.३० वाजता : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन, स्थळ : राजसदर, सकाळी ९.५० वाजता : युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन, सकाळी १०.१० वाजता, युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक, सकाळी १०:२० वाजता : मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्याचा अभिषेक, सकाळी १०.२५ वाजता : प्रास्ताविक : अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, सकाळी १०:३० वाजता : युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन, सकाळी ११.०० वाजता : सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ, दुपारी १२.०० वाजता : जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप, दुपारी १२:१० वाजता : युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन.