“जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजन
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बुधवारी, १९ फेब्रुवारीरोजी सकाळी ढोल पथक, लेझीमच्या तालावर पदयात्रा सुरू झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पदयात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. पदयात्रेत तलवारबाजी, लेझिम, सजीव देखावा, पारंपरिक नृत्य, जिम्नॅस्टिक खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.