छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम
परभणी फाउंडेशनचा उपक्रम
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी फाउंडेशनतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परभणी फाउंडेशनचे समन्वयक विकास सोळंके, दत्ता गिराम, शुभम डहाळे, सिद्धेश्वर जाधव, दीपक भरोसे, व्यंकटेश देशमुख, अमर लासे, रितेश तांबोळी, आदित्य जोगळेकर आदींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी परिसराची स्वच्छता करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही स्वच्छ केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काळात स्वच्छता, शिस्त आणि लोककल्याणावर भर दिला होता. त्यांच्या विचारांना कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वच्छतेमुळे केवळ परिसर सुंदर दिसतो असे नाही, तर त्यामुळे आरोग्यदायी वातावरणही तयार होते. घाण आणि कचऱ्यामुळे होणारे विविध आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन उपस्थित समन्वयकांनी केले. परभणी फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण होईल आणि समाजहिताची जाणीव वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.